अजित पवार व नाना काटे यांचा घरोबा सर्वश्रुत
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१२ फेब्रु.) :- आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात पाय रोवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांनी आपली ताकद खर्ची करून, शड्डू ठोकून या ना त्या कारणाने आपले नाव चर्चेत ठेवले आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघात पक्षाची ताकद कमी आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांनी काट्यास काटा लढत देत, तिस-या क्रमांकाची मते मिळवली होती. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने चिंचवड विधानसभा मतदार संघावर लक्ष्य केंदित केले आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांना टक्कर देण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जोमाने कामास लागले असून, मावळ लोकसभेसाठी आपले सुपुत्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा त्यांनी घडवून आणली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा विरोधकांनी धसका घेतला आहे. तसेच सध्या शहरात पार्थ पवार यांचा राबता वाढला आहे. पार्थच्या पिंपरी चिंचवड शहर भेटीने राष्ट्रवादी पक्षात नवचैतन्य पसरले असून, नेतेमंडळी, शहराध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते जोमाने कामास लागले आहेत.
पार्थ पवार यांनी पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी यांच्या समवेत नुकताच शहर राष्ट्रवादीने केलेल्या विकासकामांचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी विविध विकासकामांची पाहणी केली. राष्ट्रवादीने केलेली विकासकामे पाहून ते भारावून गेले होते. तसेच त्यांनी चिंचवडचे श्रद्धास्थान मोरया गोसावी मंदिरास भेट दिली व मोरया गोसावींचे आशीर्वाद घेतले. लोकसभेसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा अद्याप झालेली नसली, तरी आगामी लोकसभेच्या दृष्टीने ते तयारीस लागले असल्याची, शहरात कुजबुज सुरु आहे. यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादीचे नेते व नगरसेवक नाना काटे यांच्या निवासस्थानी भेट दिली व स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला होता. नाना काटे व अजित पवार यांचा घरोबा सर्वश्रुत आहे. तसेच नाना काटे यांनी मागे घेतलेल्या रोजगार मेळाव्यास अजित व पार्थ पवारांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे नाना काटे यांचे नाव चर्चेत असून, आगामी चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीसाठी नाना काटे हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील काय? असा कयास आताच राजकीय विशेषज्ञ वर्तवू लागले आहेत.











