न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रु.) :- चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स म्हणजेच आयआयएमएस च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला संस्थेतून एमबीए पूर्ण झाल्यानंतर विविध नामांकित औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांमधून चांगल्या हुद्यांवर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुदीती चव्हाण या माजी विद्यार्थिनींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर प्रा. अमर गुप्ता यांनी हा मेळावा आयोजित करण्याचा हेतू सांगितला.
याप्रसंगी आपल्या स्वागतपर भाषणात संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस म्हणाले की, ‘माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी एकत्र येतात, त्यांच्यात आपापल्या नोकरी- व्यवसायाच्या माहितीची देवाण घेवाण होते, विशेष बाब म्हणजे यावेळी त्यांच्या मनोगतातून ते आपल्या महाविद्यालयीन काळातील आठवणींना उजाळा देत असतानाच विद्यार्थी मित्रांना वडीलकीच्या नात्याने अनुभवाचे बोल सांगत मार्गदर्शनही करतात. माजी विद्यार्थ्यानीही जसा वेळ मिळेल तसे महाविद्यालयाच्या विविध कार्यशाळांमधून सक्रिय सहभाग घ्यावा’ असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद मराठे यांनी आपल्या भाषणात माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी आशिष प्रचंडे यांची तर उपाध्यक्षपदी शितल महामुनी यांच्या नावाची घोषणा केली. माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने संस्थेबद्दल, अध्यापकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळत असते. त्यात आपण सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन योगदान दिले पाहिजे, अशी भावना माजी विद्यार्थी संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आशिष प्रचंडे यांनी आपल्या मनोगतात यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी आजी-माजी विद्यार्थ्यांमध्ये अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रमसुद्धा विशेष रंगला. ग्रुप फोटोसेशन व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.











