- वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घातक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२२) :- पिंपरी – चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ई-बाईक्स वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केल्याप्रकरणी वाहनचालकांवर कारवाई केली आहे. बेकायदेशीर बदल करून वाहन विक्री केल्यास रस्ता सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. ई – बाईकला आग लागून अपघात होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
वाहन उत्पादक, वितरक आणि नागरिकांनी अशा वाहनांमध्ये अनधिकृत बदल करू नये. अनधिकृत बदल केले असल्यास ते त्वरित पूर्वरत करावे. राज्यात सर्वच ठिकाणी यासाठी तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत अनधिकृत बदल केल्याचे आढळून आल्यास मोटार वाहन कायदा १९८८ तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याच्या सूचना सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
वाहने खरेदी करण्यापूर्वी संबंधित वाहन वितरक आणि उत्पादक यांच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेचा टाईप अप्रूव्हल टेस्ट रिपोर्ट आहे, हे पाहावे. परिवहन आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या परवानगीची प्रत असल्याची खातरजमा करावी. अधिकृत संस्थेने मान्यता दिलेल्या मानकांप्रमाणेच वाहन आहे का, हे तपासावे.
- ई – वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घातक आहे. त्यामुळे कोणीही असे बदल करू नयेत. ज्यांनी अनधिकृत बदल केले आहेत. त्यांनी पूर्ववत करावेत. राज्य परिवहन विभागाने दिलेल्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येत आहे.
– मा. अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी…