न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड शहरातील शास्तीकर, प्राधिकरणातील घराचा प्रश्न, रिंगरोड, रेडझोन आदी प्रश्न तसेच विविध विकासकामांच्या निविदेत केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जनसामान्यांचे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय विरोधक व सामाजिक संस्था एकत्र आल्या होत्या. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सोमवार (दि. ११) रोजी पिंपरी चिंचवड मनपा इमारतीस मानवी साखळीद्वारे हातात गाजर घेऊन घेराव आंदोलन करण्यात आले होते.
यात शहरातील मुख्य पक्ष व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी सहभागी झाले होते. शहरवासीयांच्या प्रश्नावर एकत्र येऊन केलेल्या आंदोलनाला मात्र, गालबोट लागले. सहभागी पक्षांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना छावा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळेकर यांनी खासदार श्रीरंग बारणे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळे आंदोलनात सहभागी शिवसैनिक चांगलेच खवळून उठले. खासदारांचे नाव का घेतले, असा जाब शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर आणि संपर्क प्रमुख युवराज दाखले यांनी छावा संघटनेला विचारला व त्यावरून वादंग पेटले होते.
त्याबाबत शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, पिंपरी चिंचवड शहराचे लोकप्रतिनिधी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे व भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांना खालच्या पातळीवर शिवीगाळ करणाऱ्या स्वंयघोषित पुढारी धनाजी येळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे युवराज दाखले यांनी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे निवेदनादवारे केली आहे.
यात दाखले यांनी म्हटले आहे की, ”या आंदोलनाच्या दरम्यान स्वंयघोषित पुढारी धनाजी येळकर याने ‘शास्तीकर’ या विषयाला बगल देऊन, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे व भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर येऊन, शिवीगाळ करुन, सर्वसामान्य जनतेचे माथी भडकवण्याचे काम केले आहे. वास्तविक पाहता साहेब स्वंयघोषित पुढारी धनाजी येळकर हा सर्वसामान्य व विविध व्यापारीवर्गाला दमदाटी व ब्लॅकमेलिंग करुन स्वतःचे कुंटुंब चालविण्याचा उद्योग करीत आहे.
तरी आपण वरील गोष्टीची गांर्भीर्याने दखल घेऊन, आपल्या गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करुन, या स्वंयघोषित पुढाऱ्यावरती येत्या २१ दिवसांच्या आत कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा शिवसेना व शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने जनआंदोलन छेडले जाईल. या कामी उद्भवनार्या सर्वगोष्टींची जबाबदारी आपली व आपल्या प्रशासनाची राहील”, असे शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख व शिव व्यापारी सेनेचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.











