न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२२) :- श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू येथे येणार आहेत. त्यांच्या हस्ते देऊळवाड्यात देशातील आधुनिक पद्धतीच्या वारकरी स्तंभावर वारकरी पताकेचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
या ध्वजस्तंभाच्या उभारणीस बुधवारी (दि. १) सुरुवात झाली आहे. याबाबत संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी माहिती दिली. या ध्वजस्तंभाचे लोणावळा येथील आदित्य रमेश व्यास व दिलीप नथू आंबेकर यांनी डिझाईन केले आहे. तांत्रिक कामही आदित्य व्यास यांनीच केले आहे.
असा आहे स्तंभ…
या स्तंभाची उंची ६१ फूट असून, पूर्णपणे उच्चप्रतीच्या लोखंडाचा आहे. त्याचे वजन सुमारे एक हजार किलो आहे, या स्तंभावरच एलईडी लाईट बसविण्यात आली आहे. या ध्वजाची दोरी बाहेरून दिसणार नाही. या ध्वजाची दोरी आतील बाजूला आहे. विद्युत रोषणाईचे वायरही खांबाच्या आतील बाजूने आहेत. अशा प्रकारचा स्वयंचलित ध्वजस्तंभ भारतातील पहिलाच आहे. हा स्तंभ उभारण्यासाठी पारंपरिक तंत्राचा साखळदंड व पुली यांचा वापर केला आहे. स्तंभासाठी दगडी चौथरा बांधण्यात येणार आहे.














