- पिपरी चिंचवड शहरातून उमा खापरे यांना विधानपरिषदेवर उमेदवारी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२२) :- भाजपाकडून विधानपरिषदेसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.राज्यातील बड्या नेत्यांना डावलून भाजपने खापरे यांना विधानपरिषदेवर संधी दिल्याने राजकिय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
याशिवाय भाजपच्या यादीत प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय यांच्याही नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तशी यादी भाजपने आज जाहीर केली आहे. पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. मात्र भाजपाने उमा खापरे यांच्या रुपाने नव्या चेहऱ्याला संधी देत एकप्रकारे दिग्गज नेत्यांना धक्का दिल्याचं बोललं जात आहे.
खापरे या गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक आणि जुन्या एकनिष्ठ भाजप पदाधिकारी आहेत. भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. त्यापूर्वी त्या महिला मोर्च्याच्या प्रदेश सचिव होत्या. तर, त्याअगोदर त्या दोन टर्म पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवक राहिलेल्या आहेत. २००१-०२ मध्ये पालिकेत त्या विरोधी पक्षनेत्या होत्या.
पिंपरी-चिंचवडला तिसरा आमदार मिळणार आहे. तीन विधानसभा मतदारसंघ असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरीत महेश लांडगे, तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप आणि निवडणुकीत विजयी होताच उमा खापरे या भाजपच्या तिसऱ्या आमदार होणार आहेत.