न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रु.) :- बिजलीनगर येथील रेल विहार सोसायटीमध्ये सोमवार (दि. ११) रोजी रात्री १०.०० वाजेच्या सुमारास जखमी अवस्थेतील घुबड दोन मांजरांपासून जीव वाचवत दगडी कमानीजवळ उडण्याचा प्रयत्न करीत होते.
परंतु, भेदरलेल्या ह्या घुबडास आर्चीस रेळेकर, अभिजीत मदने, अक्षय कंक, श्रीधर कृष्णमूर्ती, संतोष चव्हाण या दक्ष कार्यकर्त्यानी सुरक्षितता प्रदान करून, पक्षीप्रेमी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांना कळविले. त्यांनी त्वरित रेल विहार सोसायटी येथे धाव घेतली व सदरच्या घुबडास सुरक्षितपणे ताब्यात घेतले व प्राथमिक उपचार केले. आज रोजी सदरच्या घुबडास पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बहिणाबाई प्राणी संग्रहालय येथे डॉ. पवार यांचेकडे सुपूर्त केले.
या संदर्भात विजय पाटील म्हणाले,” गेल्या २६/१२/२०१७ पासून बहिणाबाई प्राणी संग्रहालयाचे नुतनीकरणाचे काम सुरू असून, शहरात रात्रीच्या वेळी वन्यजीव, जखमी पक्षी आणि प्राण्यांना जमा करण्याकरिता कोणतीही सोय महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने सद्यस्थितीत पिंपरी चिंचवड शहरात केलेली नाही. त्यामुळे पक्षीप्रेमी व पर्यावरण अभ्यासक यांना प्रशासनाची कोणतीच मदत उपलब्ध होत नाही. अनेक वन्यजीव रात्रीच्या वेळेतच जखमी अवस्थेत नागरिकांना आढळून येतात. त्यांना कोठे उपचारासाठी दाखल करायचे हा मोठा प्रश्न आहे. सकाळी १०.०० वाजेपर्यंत अश्या वन्यजीवांना नागरिकांनाच सांभाळावे लागते. सदर बहिणाबाई प्राणी संग्रहालयाचे काम तातडीने पूर्णत्वास न्यावे.”











