न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रु.) :- मावळ लोकसभा मतदारसंघात गेल्या ५ वर्षात सामान्य जनतेशी समरस होऊन, खासदार श्रीरंग बारणे यांनी कामाचा वचक निर्माण केलेला आहे. त्यांच्यावर टिका करणाऱ्यांनी स्वतःची लायकी पाहून टीका करावी. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोदी लाट असतानाही त्यांना निवडून येता आले नाही, असा आरोप शिवसेना नगरसेवक सचिन भोसले यांनी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यावर केला आहे.
सचिन भोसले यांनी प्रसिध्दीपत्रक काढले असून, त्यात म्हटले आहे की, लायकीपेक्षा मोठे पद महापालिकेत मिळाल्याने एकनाथ पवार सुर्यावर थुंकण्याचा प्रकार करीत आहेत. खासदार श्रीरंग बारणे हे सर्वसामान्य जनतेसाठी काम करतात, लोकांमध्ये मिसळून राहणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती आहे. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद केलेल्या श्रीरंग बारणे यांची स्वत: लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी स्तुती केली आहे. महाजन या भाजपच्या ७ वेळा खासदार राहिल्या आहेत. खासदार बारणे यांनी सलग पाच वर्षे संसदरत्न पुरस्कार पटकावून इतिहास रचल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची माती सरकू लागली आहे.
एकनाथ पवार हे डोळ्यावर पट्टी बांधून काम करत आहेत. महापालिकेत चाललेला भ्रष्ट कारभार, जनतेच्या पैशाची सुरू असलेली लूट त्यांना दिसत नाही. त्यांना स्वप्नातही खासदार बारणेच दिसू लागले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले की, ”आप्पा तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देवू नका, जनता तुमच्या बरोबर आहे. सतत जनहिताचे काम करणाऱ्या माणसांना त्रास होतच असतो.
निष्क्रिय, भ्रष्टाचारी व लुच्चेगिरी करणाऱ्यांच्या पत्रकबाजीस उत्तर न देता, जनहिताचे काम करीत रहावे. मतदारराजा उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. चिंता विरोधकांना आहे. त्यांनी आप्पांचा धसका घेतला आहे. भ्रष्ट व निष्क्रिय कार्यकर्त्याच्या पत्रास खासदार बारणे यांनी कोणतेही उत्तर देण्याची आवश्यकता नाही, असे या पत्रात भोसले यांनी म्हटले आहे.











