- राज्यसभेच्या मतदानासाठी एअर अँब्युलन्सने नव्हे तर, रस्त्याने मुंबईकडे रवाना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०२२) :- राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज होणाऱ्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. चिंचवड विधानसभेचे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजाराने त्रस्त असतानाही मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव लक्ष्मण जगताप मतदान प्रक्रियेत सहभागी होणार की नाही असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून होता. अखेर ते रुग्णवाहिकेतून मुंबईसाठी रवाना झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले लक्ष्मण जगताप यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दीड महिन्यांच्या उपचारानंतर त्यांना २ जून रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांना एअर अँब्युलन्समधून नेणार असल्याची चर्चा होती. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला असून त्यांना रस्त्याने नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू शंकर जगताप आहेत.
“चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांनी आम्हाला प्रकृती ठीक असेल तरच या असं सांगितलं होतं. आम्ही लक्ष्मण जगताप यांना निरोप दिल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी संवाद साधत पक्षाला माझी गरज असून, मी प्रवास करु शकतो असं सांगितलं. तसंच निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला,” अशी माहिती शंकर जगताप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. हवामान बदलामुळे डॉक्टरांनी एअर अँम्ब्युलन्सचा पर्याय नाकारला असंही त्यांनी सांगितलं.
















