- आयुक्तांनी निर्णय मागे घ्यावा; अन्यथा मोशिकरांचा रस्त्यावर येण्याचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०२२) :- देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील कचरा मोशी कचरा डेपोत काही काळ टाकण्यासाठी आयुक्तांनी हिरवा कंदील दिला होता. मात्र कॅन्टोन्मेंट हद्दीतील कचऱ्याला मोशीकरांनी विरोध दर्शविला आहे. बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासह कॅन्टोन्मेंटचे काही पदाधिकारी होते.
मोशी कचरा डेपोमध्ये कॅन्टोन्मेंटचा कचरा टाकण्याच्या निर्णयाला आयुक्तांनी हिरवा कंदील दिल्याने मोशीकरांनी तीव्र विरोध करून, निषेध केला आहे. विविध पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील कचरा रूपनीनगरमध्ये डम्पिंग केला जातो. त्याठिकाणी जमा झालेला कचरा जाळला जातो. त्यामुळे त्याच्या धुराचा त्रास परिसरातील नागरिकांना होतो. ही समस्या नागरिकांनी आयुक्तांकडे मांडली. त्याबाबत कॅन्टोन्मेंटच्या काही पदाधिकाऱ्यांशी आयुक्तांनी बैठक घेतली. त्यात कॅन्टोन्मेंटच्या कचऱ्यासाठी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरू होईपर्यंत हा कचरा मोशी कचरा डेपोत टाकण्याचा निर्णय आयुक्त पाटील यांनी घेतला. त्यावर मोशीकरांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. अद्याप वेस्ट टू एनर्जी प्रकल्प या ठिकाणी पूर्ण क्षमतेने झालेला नाही. परिणामी मोशी कचरा डेपोवर अतिरिक्त कचरा संकलन केला तर यंत्रणेवर ताण येणार आहे. मोशी कचरा डेपोचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. हा कचरा डेपो दुसरीकडे हलवावा ही मोशीकरांची मागणी आहे. मात्र त्यात अजून कॅन्टोन्मेंटच्या कचऱ्याची भर पडेल. हा निर्णय आयुक्तांनी मागे घ्यावा; अन्यथा मोशीकर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहेत, असा इशारा मोशीकरांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले आहे. या वेळी राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, माजी नगरसेवक वसंत बोराटे आदींनी आयुक्तांकडे याबाबत मागणी केली आहे.
कॅन्टोन्मेंट परिसरातील कचरा जास्त नाही. तेथील जागा विकसित करेपर्यंतच हा कचरा मोशी डेपोत जमा करण्यात येणार आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही. त्यामुळे मोशीकरांनी यासाठी सहकार्य करावे.
– राजेश पाटील, आयुक्त, पिंपरी – चिंचवड महापालिका…