- पालखीचे २१ जूनला होणार पंढरीकडे प्रस्थान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०२२) :- श्री संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांचे गाथा लेखक व चौदा टाळकऱ्यांपैकी एक श्री संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा प्रस्थान सुदुंबरे येथून सोमवारी (दि. २०) सायंकाळी चारला समाधी स्थळापासून गावातील विठ्ठल रुख्मिणी मंदिरामध्ये (आजोळी) होत आहे.
या रथास पाच बैलजोड्यांपैकी निवड समितीने पाहणी करून दत्तोबा धोंडीबा बधाले (रा. नवलाख उंब्रे – जाधववाडी, ता. मावळ) यांच्या बैलजोडीची निवड करण्यात आली. अश्व (घोडा) भानुदास दशरथ गवळी हतवळण (ता. दौंड) यांचा आहे.
पालखी सोहळा गेली ४५ वर्षे सुदुंबरे ते पंढरपूर व पंढरपूर (परतीचा प्रवास) ते सुदुंबरे होत आहे. या रथासोबत एकूण ७ दिंड्या असतात. २१ जून २०२२ रोजी सकाळी आठला पंढरपूरकडे सोहळा मार्गस्थ होईल. वारकरी बांधवांनी व ग्रामस्थांनी सोहळ्यामध्ये सामील व्हावे, असे आवाहन पालखी सोहळा समितीच्या अध्यक्षांनी केले आहे.