- सभेचेही आयोजन; दोन हजार पोलिसांचा घटनास्थळी बंदोबस्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२२) :- देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने देहू परिसरात छावणीचे स्वरूप आले आहे. मोदींच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. यासाठी १० पोलीस उपायुक्त, १० साहाय्यक पोलीस आयुक्त, १०० पोलीस निरीक्षक, ३०० पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक असे एकूण २ हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही तासांमध्ये देहूत दाखल होणार आहेत. त्यांच्या हस्ते शिळा मंदिर आणि जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा होणार आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी देहू नगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षसाठी मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. २ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी असणार आहेत.
ज्या नागरिकांना सभास्थळी जायचं आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे. सकाळी ८ वाजल्यापासून जुना मुंबई महामार्गावरून देहूत केवळ व्हीआयपी व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. इतर वाहनांना प्रवेश नाही. सभास्थळी जाण्यासाठी तीन रस्ते ठेवण्यात आले आहेत. तळवडे, म्हाळुंगे आणि इंदोरी बाजूने या मार्गावरूनच नागरिक येऊ शकतात. पण, देहू गावात प्रवेश करण्यास मनाई आहे.