- आयुक्त राजेश पाटील यांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रभागरचना तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, ३१ मे २०२२ पर्यंतच्या मतदार यादी करण्याच्या कामास विलंब होणार असल्याने शुक्रवारी (दि. १७) प्रारूप मतदार यादी करता येणार आहे. त्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
निवडणूक आयोगाने ४६ प्रभागनिहाय मतदार यादी तयार करून प्रारूप मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. पालिकेने ५ जानेवारी २०२२ पर्यंत तयार झालेल्या पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर विधानसभा मतदार संघनिहाय मतदार यादीवरून प्रभागनिहाय मतदार यादीचे काम पूर्ण केले होते. मात्र, आयोगाने ३१ मे २०२२ पर्यंतच्या मतदार यादीनुसार प्रभागनिहाय यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. पाच जानेवारी ते ३१ मे या पाच महिन्यांच्या कालावधीत सुमारे ७५ हजार नव्या मतदारांची नोंदणी झाली आहे. एका कर्मचाऱ्यास ६ मतदार यादीचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारपर्यंत प्रारूप मतदार यादीचे काम पूर्ण होणार नसल्याने यादी शुक्रवारी प्रसिद्ध केली जाणार नाही. त्या कामासाठी आठ दिवसांची मुदतवाढ देण्याची विनंती आयुक्त पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुदतवाढ मिळाल्यास मतदार यादीचा कार्यक्रम लांबणीवर पडणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ५ जानेवारी २०२२ ऐवजी ३१ मे २०२२ पर्यंत नोंद झालेल्या मतदारांच्या यादीनुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी बनविण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यात अधिक वेळ जाणार आहे. त्याबाबत काम सुरू आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी ८ दिवसांची वेळ वाढवून मागण्यात आली आहे, असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.