- आता घरबसल्या लायसन्ससह मिळणार इतर सेवा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२२) :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) नुकत्याच सहा सेवा ऑनलाइन केल्या आहेत. या सेवा पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने राबवण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये लायसन्सचे नूतनीकरणही आता ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आरटीओ कार्यालयामध्ये कागदपत्रे घेऊन जाण्याची आवश्यकता आता भासणार नाही. तर वाहन परवाना नूतनीकरण पेपरलेस झाले आहे.
आरटीओ कार्यालयाने पेपरलेस कारभारासाठी सहा सेवा ऑनलाइन केल्या आहेत. त्यामध्ये ना हरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्त्यातील बदल, वाहन चालक अनुज्ञप्तीचे (लायसन्स) दुय्यमीकरण, वाहन चालक अनुज्ञप्तीवरील पत्ता, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज आणि वाहन चालक अनुज्ञप्तीचे नूतनीकरण हे ऑनलाइन करण्यात आले आहे. लायसन्सचे नूतनीकरणही घरी बसूनही करता येणार आहे. यासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याचीही गरज पडणार नाही. त्यामुळे वेळेची तर बचत होईलच. त्याबरोबर कागदपत्रांची प्रत काढण्याचीही गरज पडणार नाही. त्यामुळे कागदांचीही बचत होणार आहे, अशी माहिती अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली.
कसा करा ऑनलाइन अर्ज…
अर्जदाराकडील मोबाइल नंबर आधार क्रमांक लिंक केलेला असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवलेला ओटीपी वापरून अर्जदाराला आधार क्रमांक पडताळणीद्वारे परिवहन या संकेतस्थळावर माहिती भरावी लागेल. आधार पोटलवरून अर्जदाराच्या इतर वैयक्तिक माहितीशी संबंधित योग्य पडताळणी केल्यानंतरच अर्जावर कार्यवाही केली जाईल.
















