न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२२) :- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) कडून पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीसह रुग्णालये, महापालिका शाळेच्या इमारतींसाठी सुरक्षा ठेव म्हणून ३ लाख ९७ हजार ७०० रूपयांची मागणी केली आहे. सुरक्षा ठेवीचे पत्र महावितरणने महापालिकेच्या विद्युत विभागाला धाडले आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या शहरातील विविध भागात सुमारे साडेनऊशे मिळकती आहेत. जन कल्याणासाठी किंवा जनसेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या इमारतींना आतापर्यंत महावितरणने कधीही सुरक्षा ठेव म्हणून बिल पाठविले नव्हते. महापालिकेच्या व्यावसायिक असलेल्या मिळकतींकडून सुरक्षा ठेव म्हणून महावितरणला पैसे अदा केले जातात. मात्र, तोट्यात असलेल्या महावितरणने आता जनकल्याणासाठी वापरण्यात येणाऱ्या इमारतींनाही सुरक्षा ठेव म्हणून बिल पाठविण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीला तब्बल ३ लाख ९७ हजार ७०० रूपयांचे सुरक्षा ठेवीचे बिल मे महिन्यात पाठविले आहे.
महापालिकेची इमारत, शाळा, रुग्णालये जन कल्याण जनसेवेसाठी वापरण्यात येतात. आतापर्यंत अशा इमारतींना कधीही महावितरणने सुरक्षा ठेव म्हणून बिल पाठविले नव्हते. यावेळेस प्रथमच महावितरणने सुरक्षा ठेवीसंदर्भात बिले पाठविली आहे.
– संदेश चव्हाण, सहशहर अभियंता, विद्युत विभाग…
















