- प्राधिकरण नाट्यगृहात अकादमी सुरू करण्याची सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून निगडी येथील संगीत अकादमीच्या नुतनीकरणाच्या नावाखाली तब्बल साडेतीन कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात येत आहे. भाजपच्या सत्ताकाळात कोणत्याही कामांवरून बोंब मारणारे मंडळी या उधळपट्टीवरून मौन बाळगून आहेत. मात्र, प्रशासनाने तातडीने संगीत अकादमीच्या नावावर होणारी उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव तथा कलारंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांनी केली आहे.
या संदर्भात अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्याकडे पत्राव्दारे मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून अ प्रभाग कार्यालयाअंतर्गंत निगडी येथील संगीत अकादमीचे स्थापत्यविषयक व सुधारणांची कामे करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. या निविदेची ३, ३७, ५१, १६४ रुपये इतका खर्च या कामावर करण्यात येणार आहे. मागील २० वर्षा पेक्षा जास्त वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. या कामाची निविदा पाहिल्यानंतर मला आश्चर्य वाटले आहे. आयुक्त म्हणून आपण या संगीत अकादमीची जागा पहावी. ती महानगरपालिकेच्या संत तुकाराम महाराज व्यापारी संकुलाच्या सगळ्यात शेवटच्या मजल्यावर आहे. सुमारे ८ हजार स्क्वेअर फूट जागेत ही अकादमी आहे.
या ठिकाणी असलेल्या या अकादमीचे नुतनीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च महानगरपालिका करत आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या आणि प्रशासनाच्या कारभाराविषयी आणि संकुचित सांस्कृतिक धोरणाविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही जागा त्यावेळी तात्पुरती सोय म्हणून तेथे संगीत अकादमी सुरू केलेली आहे. शहराला मोठ्या संगीत अकादमीची आवश्यकता आहे. या जुन्या जागेसाटी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च केले जात आहेत. त्याऐवजी निगडी प्राधिकरण परिसरात नवीन नाट्यगृह होत आहे. त्या आवारात नवीन संगीत अकादमीसाठी खर्च केल्यास ते योग्य राहील. तसेच, ती संगीत अकादमी खऱ्या अर्थाने शहराला शोभा देणारी ठरेल. त्यामुळे महानगरपालिकेचा होणारा खर्च वाचणार आहे, असे अमित गोरखे यांनी नमूद केले आहे.