न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२२) :- सोनसाखळी चोरून पसार होणारे अल्पवयीन मुलं पायी चालत जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी, मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून जायचे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी १५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासले. पोलिसांनी सापळा रचून या मुलांना ओटा स्कीम निगडी येथून ताब्यात घेतले आहे.
या अल्पवयीन मुलांकडे चौकशी केल्यानंतर दोन आरोपींची नावे समोर आली आहेत. हे आरोपी अल्पवयीन मुलांच्या पालकांना मूव्हर्स अँड पॅकर्स या कंपनीमध्ये मुलांना कामाला लावतो, असे सांगून त्यांना घरातून घेऊन जात. जास्त पैसे देतो असे आमिष दाखवून आरोपी या अल्पवयीन मुलांना चोरी करायला लावायचे.
पोलिसांनी अल्पवयीन मुलांकडून २० तोळे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नितीन संजय सरोदे आणि दिलीप रामदास खंदारे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.