- प्रभाग रचनेच्या पारदर्शकतेवर आज कोर्टाचा अंतिम फैसला…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२२) :- राज्य निवडणूक आयोग आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या निवडणूक यंत्रणेमार्फत प्रभाग रचनेची कार्यवाही चुकीची केली आहे. ही प्रक्रिया रद्द करावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर आज शुक्रवारी सुनावणी होईल.
पिंपरी – चिंचवड महापालिका प्रभाग रचनेसंदर्भात वारंवार लेखी तक्रारी व हरकती घेऊनदेखील पिंपरी – चिंचवड आयोगाची महापालिका व राज्य निवडणूक यंत्रणा यांच्याकडून कोणताही न्याय मिळाला नाही त्यामुळे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर ९ जूनला सुनावणीदरम्यान वकिलांनी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रारुप प्रभागरचनेवर घेतलेल्या हरकतींवर सुनावणीसाठी प्राधिकृत अधिका-यांचा सुनावणी अहवाल उपलब्ध न करून दिल्याबाबत आक्षेप घेतला होता.
मडिगेरी म्हणाले, झालेल्या प्रभागरचनेतील त्रुटी व राज्य निवडणूक आयोगाच्या चुकांसंदर्भात सविस्तर म्हणणे उच्च न्यायालयाने ऐकून घेतले आहे. वेळोवेळी सुनावणीमध्ये कार्यवाही झालेली आहे.