- निगडीतील घटना; आरोपी गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०२२) :- सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या मुसक्या आवळून पोलिसांनी पेट्रोल पंपावर दरोड्याचा डाव उधळून लावला. आरोपींकडून घातक शस्त्रे आणि दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ही कामगिरी केली.
आनंद राजू गवळी ( वय २०, रा. आझाद चौक, निगडी), दीपक अरुण चांदणे (वय २२, रा. ओटास्किम, निगडी), सागर रामदास जाधव (२१, रा. ओटास्किम निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
युनिट दोनच्या पथकातील पोलीस नाईक नामदेव कापसे आणि पोलीस शिपाई अजित सानप यांना माहिती मिळाली की, दाद्या गवळी टोळीचा म्होरक्या आनंद उर्फ दाद्या गवळी, तडीपार गुन्हेगार जाकीर पठाण, तडीपार गुन्हेगार सागर जाधव आणि इतर साथीदार ट्रान्स्पोर्टनगर येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार आहेत. त्यासाठी ते भीमाईनगर ओटास्कीम निगडी येथे एकत्र जमले असून घातक शस्त्रे व साहित्याची जुळवाजुळव करीत आहेत. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावून आनंद गवळी, दीपक चांदणे, सागर जाधव आणि दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तलवार, दोन कोयते, रॉड, मिरची पूड, दोरी, मोबाईल फोन, रोख रक्कम असे साहित्य जप्त केले आहे.
















