न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०२२) :- मालवाहू प्रवासी वाहनांमध्ये नियमबाह्य बदल करून त्याचे रुपांतर फिरत्या उपहारगृहामध्ये (फूड ट्रक) करण्याचे प्रकार शहरात सर्रास सुरू आहेत. बेकायदेशीरपणे बदल केलेल्या या वाहनांत इंधन तेलाचा भडका, गॅस गळतीसह इतर कारणाने वाहनाचा स्फोट होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शहरात लवकरच विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
राज्यभरात अनेक मालवाहू, प्रवासी वाहनांमध्ये नियमबाह्य बदल करून त्याचे रुपांतर फिरत्या उपहारगृहामध्ये (फूड ट्रक) करण्यात आले आहे. सध्या अशी हजारो उपहारगृहे राज्यात सुरू आहेत. परिवहन आयुक्तांना अशा वाहनांवर कारवाईसाठी विशेष मोहीम घेण्याचे आदेश दिले आहेत.
परिवहन आयुक्त कार्यालयाने नुकतेच याबाबत राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना आदेश पाठवले आहेत. स्थानिक कार्यक्षेत्रातील वाहतूक नियंत्रण शाखा, अतिक्रमण विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, आरोग्य विभागाशी समन्वय साधून अवैधरित्या सुरू असलेल्या फिरत्या उपहारगृहांची तपासणी मोहीम राबवून कारवाई करण्यात यावी, असे या आदेशात नमूद आहे. सोबत या कारवाईचा अहवाल देखील सादर करण्यास सांगितले आहे.
वाहनांमध्ये बदल करून चालविण्यात येणाऱ्याा फिरत्या उपहारगृहांवर कारवाई करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार याबाबत लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.
– अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मोशी…
















