- मात्र, एकनाथ शिंदे गटाचं चाललंय भलतंच; राज्यपालांकडे केली ही मागणी….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२२) :- शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे बंडखोरी केल्यानंतर आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा केला आहे. शिवाय आमदारांसोबतचा फोटोही शेअर केला होता. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा नेमका आकडा समोर आला आहे. त्यावर आज उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
बोलताना उद्धव ठाकरे यांनी भावनिक शब्दांमध्ये भूमिका मांडली. “समोर बसा. मी आज माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतो आहे. हा कुठेही लाचारीचा प्रसंग नाही. मजबुरी अजिबात नाही. काय होईल जास्तीत जास्त? परत लढू. जोपर्यंत माझ्यासोबतच शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आज शिवसैनिकांनाही आवाहन करतोय. ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं जे म्हणतात त्यालाही माझ्याकडे उत्तर आहे. जर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटत असेल की मी शिवसेना प्रमुख पद सांभाळायला नालायक आहे, तर मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन. पण समोर येऊन सांगायला हवं. मी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना प्रमुखपद सोडेन. मी मुख्यमंत्रीपद सोडून पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत असेल, तर मला आनंद आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा. समोर या, आणि सांगा”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होत असल्याचं सांगताना आपण कोणतंही नाटक करत नसल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “एकच सांगेन. पदं येत असतात, जात असतात. आयुष्याची कमाई पदं नसतात. तिथे बसून तुम्ही जे काम करता, त्यानंतर जनतेची जी प्रतिक्रिया असते, ती कमाई असते. या अडीच वर्षात आपली कुठे भेट झाली? याच माध्यमातून आपण भेटलो आहोत. ही आयुष्याची कमाई माझ्यासाठी भरपूर आहे. मुख्यमंत्रीपद तेव्हा अनपेक्षितपणे आलं. तुम्ही सांगाल, तर मी आत्ता त्यावरून पायउतार होईन. हे माझं नाटक नाही. या लोकशाहीत ज्यांच्याकडे संख्या जास्त आहे, तो जिंकतो. मग तुम्ही ती कशी जमवता, हे महत्त्वाचं नसतं. मी ज्यांना माझे मानतो, त्यांच्यापैकी कितीजण तिकडे गेलेत? माझ्याविरुद्ध मतदान केल? हे महत्त्वाचं नाही. माझ्याविरोधात एकानंही मतदान केलं, तरी माझ्यासाठी ती लाजिरवाणी बाब आहे”, असंही उद्धव ठाकरे यावेळी फेसबुक लाईव्हमध्ये म्हणाले.
मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीला चिकटून बसणारा नाही. मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. कोणताही मोह मला थांबवू शकत नाही, पण हे माझ्या समोर येऊन बोला. उगाच काहीतरी शिवसेनेशी आम्ही गद्दारी करणार नाही. पण ही शिवसेना आमची नाही, असं म्हणू नका. या सगळ्यात नुकसान कोणाचं होतं? असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे गटाने आमदारांची ऑनलाईन परेड करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची वेळ मागितली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपल्याकडे जे संख्याबळ आहे ते संख्याबळ आपण दाखवणार आहोत यासाठी शिंदे गटांनी राज्यपालांची वेळ मागितली असल्याची माहिती आहे.