- अंतिम मतदार यादी ९ जुलैला होणार प्रसिद्ध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी गुरुवारी (दि. २३) प्रसिद्ध केली जाणार आहे. एकूण ४६ प्रभागनुसार ही मतदार यादी असणार आहे. त्यावर जुलैपर्यंत हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. मतदार यादी पालिका भवनातील निवडणूक विभागात उपलब्ध आहे.
राज्य निवडणूक आयोगाने पाच ५ जानेवारी २०२२ ऐवजी ३१ मे २०२२ पर्यंतच्या मतदार यादीनुसार प्रभागनिहाय यादी तयार करण्याचे आदेश नव्याने दिले. पाच जानेवारी ते ३१ मे या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल ७५ हजार नव्या मतदारांची नोंदणी झाली आहे. जानेवारीपर्यंत शहरात १४ लाख ४१ हजार ५५ मतदार होते. त्यामुळे शहरातील एकूण मतदार संख्या वाढली आहे. पुरवणी मतदार यादी फोडून ते प्रभागनिहाय जोडण्यास आले आहेत. त्याचे काम पूर्ण झाले असून, उद्या प्रारूप मतदार यादी पालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
हरकती व सूचना पालिका भवनातील निवडणूक विभागात गुरूवार (दि. २३ जून ते १ जुलै) पर्यंत स्वीकारल्या जाणार आहे. अंतिम मतदार यादी ९ जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास किंवा ते दुस-याच प्रभागाच्या यादीत असल्यास संबंधित व्यक्तीने स्वतः हरकत घ्यावी. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागणार आहेत. प्रभाग रचनेप्रमाणे गठ्ठ्याने किंवा माजी नगरसेवक किंवा इच्छुकांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.