न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२२) :- पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे शहरातील ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांना ”आचार्य प्र. के. अत्रे पुरस्कार २०२२” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. काळेवाडीत शनिवारी (दि. २५) रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या कार्यक्रमास शहरातील पत्रकार बांधव उपस्थित राहणार आहेत.
विजय भोसले हे दैनिक केसरीचे पिंपरी चिंचवडचे आवृत्ती प्रमुख आहेत. त्यांनी मुंबई – नागपूर येथील अधिवेशनात वार्तांकन केले आहे. विधिमंडळ वार्ताहर म्हणूनही ते गेली ३२ वर्षे नियमित काम करीत आहेत. अंधश्रद्धा, भ्रष्टाचार प्रकरणी त्यांचा सखोल अभ्यास असून त्याविरोधी त्यांची अनेक प्रकरणे राज्यभर गाजली आहेत.
मराठी पत्रकार संघ या राज्यस्तरीय संघटनेला संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांना प्र. के. अत्रे पुरस्काराने सन्मानित करण्याचा सर्वानुमते निर्णय झाला. मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांना पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव यांनी दिली. यावेळी संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, संतलाल यादव, सुनील कांबळे, महेश मंगवडे, जितेंद्र गवळी, कलिंदर शेख, दिलीप देहाडे, संजय बोरा, गणेश शिंदे, संतोष जराड, सायली कुलकर्णी, श्रद्धा कोतावडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.