- कारवाईसाठी आयुक्तांकडून अधिकाऱ्यांच्या पथकाची नियक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागास अचानक भेट देऊन तपासणी करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. जागेवर उपस्थित नसलेल्या, काम सोडून बाहेर फिरत असलेल्या, उशिराने येणाऱ्या अशा बेशिस्त कर्मचाऱ्यांवर हे पथक कारवाई करणार आहे.
या पथकामध्ये सहायक आयुक्त वामन नेमाणे यांच्या नियंत्रणाखाली प्रभारी प्रशासन अधिकारी नंदकुमार यनपुरे, मुख्य लीपिक राकेश सौदे, बाळासाहेब तुगे, लीपिक समीर ठाकर, सत्यजित मुंगी, सागर नेवाळे यांचा समावेश आहे. हे पथक पालिका भवनातील विविध विभाग तसेच, क्षेत्रीय कार्यालय व इतर विभागास अचानक भेट देऊन तेथील रजिस्टरची, हजेरीपत्रकाची व बायामेट्रिक उपस्थिती तपासली जाणार आहे.
विभागा अंतर्गत कामकाज बदलण्यात आले किंवा नाही. कार्यालयीन वेळेत विभागात काम न करता इतरत्र फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सर्व लाभ दिले जात आहेत का? ते तपासले जाईल. मुख्य लेखापरीक्षक व शासनाने काढलेल्या आक्षेपाची वेळोवेळी पूर्तता केली जाते का, प्रलंबित कामे, आयुक्तांकडे तसेच, निनावी तक्रारीं तसेच, वृत्तपत्रातील बातम्याच्या अनुषंगाने तपासणी पथक करणार आहे. बेशिस्त कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाईची शिफारस आयुक्तांकडे करण्याचे अधिकार या पथकास देण्यात आले आहेत.