न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०२२) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे. आज विधानसभेमध्ये झालेल्या विश्वासदर्शक ठरावामध्ये शिंदे सरकारने १६४ विरुद्ध ९९ मतांनी बाजी मारल्यानंतर विरोधात असणाऱ्या उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना आमदारांबरोबरच राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बाजू सभागृहामध्ये अजित पवार मांडतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
अजित पवारांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं अभिनंदन केलं. विशेष म्हणजे यावेळेस देवेंद्र फडणवीसांना ७२ तासांचं सरकारही आठवलं.
अजित पवार यांची विरोधी पक्षनेता म्हणून घोषणा करण्यात आल्यानंतर अनेक सभासदांनी त्यांच्या जागेवर जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी, “शरद पवार यांनी अजित पवारांची या पदी निवड केल्याबद्दल मी आभार मानतो,” असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना शिंदेंनी अजित पवार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतानाच विरोधी पक्षनेता हा जतनेची बाजू सरकारसमोर मांडणारा असतो असं सांगतानाच सरकार रुपी हत्तीवर नियंत्रण ठेवणारा महुतासारखा तो काम करतो, अशा शब्दांमध्ये विरोधी पक्षनेत्याची भूमिका सांगितली.