न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जुलै २०२२) :- डुडुळगाव येथील कबुतरांच्या ढाबळीत एकजण येऊन गेला असल्याचा संशय सुमित आणि त्याच्या मित्रांना होता. ज्याच्यावर संशय होता त्याच्याकडे देखील कबुतरांची ढाबळ होती. संशयावरून त्याला मारण्यासाठी सुमितच्या मित्राने त्याला इन्स्टाग्रामवरून मेसेज करून बोलावून घेतले. तो आल्यानंतर त्याला मारण्याचा कट सुमित याच्या मित्राने केला. त्यासाठी त्याने सोमवारी सकाळपासून सुमित आणि इतरांना एकत्र आणण्यास सुरुवात केली.
अकराच्या सुमारास सुमित याच्यासह पाच ते सात मित्र एकत्र आले. ते मोशी येथील जुना जकात नाक्याजवळ असलेल्या जंगलात गेले. दरम्यान, ते सर्वजण दारू पिऊन मोबाईलवर गाणी वाजवून नाचू लागले. सुमितकडे सिगारेट होती. त्याच्या एका मित्राने सुमित याच्याकडे सिगारेट मागितली. मात्र सुमितने सिगारेट दिली नाही. या कारणावरून दोन मित्रांनी सुमितच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यात जखमी झालेल्या सुमितचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्वजण घटनास्थळावरून निघून गेले.
सुमितच्या आईने मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सुमितच्या बेपत्ता होण्याबाबत तक्रार दाखल केली होती.
पोलिसांना सुमित जुना जकात नाक्याजवळ एका झाडाखाली झोपला असल्याचे त्याच्या मित्राने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे सुमितचा मृतदेह मिळून आला. सुमितच्या त्या मित्रावरील संशय बळावल्याने पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्या पाच ते सहा साथीदारांनी मिळून सुमित याचा खून केल्याचे सांगितले. ही घटना सोमवारी (दि. ४) दुपारी जुना जकात नाका, मोशी येथे घडली. सुमित सतीश बनसोडे (वय १५, रा. बनकरवस्ती, मोशी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच मुलांना ताब्यात घेतले आहे.


















