- तर दोन फौजदार नियंत्रण कक्षाशी संलग्न; पोलीस आयुक्तांचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०२२) :- अवैध धंद्यांना अभय दिल्याचा ठपका ठेवून दोन निरीक्षकांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. तसेच, कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून दोन फौजदारांनादेखील नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सोमवारी (दि. ४) रात्री याबाबतचे आदेश दिले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक इकबाल इस्माईल शेख, उपनिरीक्षक अशोक नागू गांगड अशी संलग्न करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत.
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. याची गंभीर दखल घेत निगडीचे वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले आहे तसेच, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड यांना देखील जबाबदार धरून त्यांना आरसीपी पथक येथे संलग्न करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त आळंदी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक इकबाल शेख, अशोक गांगड या दोघांना देखील नियंत्रण कक्षाशी संलग्न केले आहे. या दोन अधिकाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त कार्यालयातून सांगण्यात येत आहे.
याबाबत बोलताना आयुक्त शिंदे म्हणाले, शहरात अवैध धंद्यांचा समूळ नाश करण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले आहेत. मात्र, तरी देखील काहीजण जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचे समोर आले. त्यामुळे काही जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे देखील अवैध धंद्यांना पाठबळ देत असल्यास खपवून घेतले जाणार नाही.