न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेची चिंचवड येथील ॲटो क्लस्टर येथे सात एकर जागेत तब्बल ३१२ कोटी रूपयांची १८ मजली इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीच्या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. मात्र इमारतीचे काम पाहता आणि निविदा मोठी असल्याने निविदा भरण्यास व अभ्यास करण्यास वेळ वाढवून देण्याची मागणी होत होती. त्यामुळे निविदा सादर करण्यास १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची मुंबई – पुणे महार्गावर चार मजली इमारत आहे. इमारतीची जागा आणि वाहनतळ अपुरे पडत असल्याने ॲटो क्लस्टर येथे १८ मजली इमारत उभी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी इमारतीसाठी ३१२ कोटी रूपयांची निविदा प्रसिध्द केलीआहे.
या इमारतीचे काम मोठे असून देशभरातील विविध कंपन्या यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. निविदाही मोठी असल्याने अभ्यास करण्याच पुरेसा वेळ मिळाला नसल्यामुळे चार कंपन्यांनी अभ्यास करण्यास मुदतवात वाढ द्यावी, अशी मागणी महापालिकेकडे केली होती. त्यानुसार जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर निविदा उघडण्यात येणार आहेत.