न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२२) :- लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथकातील स्वयंसेवकांना भुशी धरणात बुडालेल्या मुंबईतील तरुणाचा मृतदेह सापडला आहे. मंगळवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून भुशी धरण परिसरात पथकाने शोधमोहीम राबविली. पाण्यात बुडालेल्या साहिलचा मृतदेह दुपारी बाहेर काढण्यात आला. साहिल सरोज (वय १९, रा. मुंबई) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.
मुंबईतील तरुणांचा गट वर्षाविहारासाठी लोणावळा, खंडाळा परिसरात सोमवारी (११ जुलै) आला होता. साहिल आणि त्याचे मित्र दुपारी धरणाच्या पाठीमागे असलेल्या धबधब्याकडे गेले होते.
धबधब्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह वाहत होता. प्रवाहात साहिल वाहून गेला आणि भुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्यातून तो २५ ते ३० फूट उंचीवरून खाली पडला. त्यानंतर स्थानिक रहिवाशांच्या मदतीने पोलिसांनी शोधमोहीम राबविली. अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली होती.