- वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करा; आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०२२) :- पावसाळ्यात जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. महापालिकेच्या नळावाटे होणाऱ्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा. जलशुद्धीकरण न केलेल्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले.
पिंपरी – चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. परिणामी, आजारांचा प्रादुर्भाव होऊन साथ पसरू नये, यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. पाणी उकळून घेऊन प्यावे, उघड्यावरील, शिळे किंवा माशा बसलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत, अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत. प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे. घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा. उलट्या – जुलाब, ताप या प्रकारचा त्रास झाल्यास वेळीच महापालिकेच्या अथवा खासगी रुग्णालयात उपचार घ्यावेत.
सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे आलेल्या कॉलरा, टायफाईड, गॅस्ट्रो, डिसेंट्री, कावीळ रुग्णांची माहिती महापालिकेच्या जवळच्या रुग्णालयास कळवावी. बांधकाम व्यावसायिकांनी लेबर कॅम्पच्या ठिकाणी महापालिकेच्या नळाचे पाणी पिण्यासाठी वापरावे. जलजन्य आजार होऊ नयेत याबाबत सर्व कामगारांना सूचना देऊन दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.














