न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रु.) :- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या जलनिस्सारण गटारांची तांत्रिक मशिनने स्वच्छता करण्यासाठी ८ मशीन्स भाडेतत्वावर घेण्यासाठी निविदा काढण्यात आलेली आहे. आठ प्रभागासाठी ही निविदा असून, सात वर्षाची मुदत राहणार आहे. प्रतिवर्षी एका प्रभागास १ कोटी ३५ लाख आणि प्रतिवर्षी १० टक्के वाढ, अशी निविदेत अट असून, सात वर्षासाठी मनपाला ९१ कोटी ६६ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
एका मशिनची किंमत सुमारे ४ कोटी असून ३२ कोटी मोजावे लागणार असून, उर्वरीत ५९ कोटी हे कर्मचा-यांवर खर्च करावे लागणार आहेत. केवळ मुख्य रस्त्यावरच या मशीनचा उपयोग होऊ शकतो. गल्ली बोळांमधील गटारांमध्येच मोठ्या प्रमाणात गटारी तुंबल्या जातात. त्यामुळे या मोठ्या मशीनचा उपयोग होणार नाही. त्याऐवजी छोट्या मशीन्स घेतल्या, तर गल्ली बोळातील गटारे देखील साफ करु शकतो. त्याचा खर्चही प्रस्तावित खर्चापेक्षा निम्मा होईल.
या संदर्भातील निविदा ४ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करण्यात आली आणि अंतिम निविदा दाखल करण्याची तारीख १३ फेब्रुवारी आहे. मात्र, निविदा भरल्यानंतर निविदापूर्व बैठक (प्री बिड मीटींग) लगेच ६ फेब्रुवारी रोजी घेतल्यामुळे अनेकांना निविदा प्रसिध्द झाल्याची माहिती नव्हती. यामध्ये इतर कंपन्यांनी भाग घेऊ नये, म्हणून निविदापूर्व बैठक लगेचच घेतल्यामुळे ठराविक ठेकेदारास डोळ्यासमोर ठेवून हा खटाटोप केला आहे, हे स्पष्ट होते. आमच्या माहितीनुसार मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिका-याला खूष करण्यासाठी हा सर्व खटाटोप चालू असल्याचे समजते.
या निविदेमुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे सदरची निविदा तातडीने रद्द करण्यात यावी. अन्यथा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामार्फत उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे या पत्रात साने यांनी म्हटले आहे.















