- खुल्या गटातील ३८ जागा होणार कमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२२) :- ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी इम्पिरिकल डाटा गोळा करण्यात आला. बांठिया आयोगाने तो न्यायालयात सादर केल्यानंतर ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण पुन्हा मिळाले आहे. त्यामुळे महापालिकेची आगामी निवडणुकीत ओबीसींना आरक्षण असेल. मात्र, राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने १३९ जागांसाठी प्रभाग रचना केली आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी) यांना आरक्षण मिळाले आहे. त्यानुसार १३९ पैकी एससीसाठी २२ जागा व एससीसाठी तीन जागा राखीव झाल्या आहेत. त्यातील अनुक्रमे ११ व दोन जागा पन्नास टक्के आरक्षणानुसार महिलांसाठी राखीव आहेत. १९ जागा ओबीसी महिलांसाठी आरक्षित राहतील. उर्वरित ११४ जागांपैकी सर्वसाधारण महिलांसाठी ५७ टक्के जागाही आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे महिलांसाठी एकूण ७० जागा आरक्षित असून ६९ जागा खुल्या आहेत. या जागांवर कोणीही निवडणूक लढवू शकतो.
ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्यासाठी अर्थात ३८ जागांसाठी खुल्या ११४ जागांतून आरक्षण सोडत काढावी लागेल. त्यामुळे उर्वरित ७६ जागा सर्वसाधारण राहतील. त्यातील ५० टक्के म्हणजेच ३८ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होतील. उर्वरित ३८ जागा खुल्या राहतील. म्हणजेच सध्याच्या सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असलेल्या ५७ जागांमधून ओबीसी महिलांसाठी १९ जागा आरक्षित होतील व उर्वरित ३८ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असतील.