- वेटलिफ्टर जेरेमी लालरिन्नुगाने पटकाविले सुवर्णपदक…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२२) :- बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंनी चमकदार कामगिरी सुरू ठेवली आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी वेटलिफ्टर जेरेमी लालरिन्नुगाने ६७ किलो वजनी गटात एकूण ३०० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले आहे. २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले आहे. जेरेमीने स्नॅच इव्हेंटमध्ये १४० किलो वजन उचलून नवीन राष्ट्रकुल विक्रम नोंदवला आहे.
१९ वर्षांच्या जेरेमीने क्लीन अँड जर्क विभागात १६० किलो वजन उचलून एकूण ३०० किलो ग्रॅम वजन उचलले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हा देखील एक नवीन विक्रम आहे. १६५ किलो वजन उचलण्याच्या अंतिम प्रयत्नाच्या शेवटी जेरेमीला दुखापत झाल्याने तो शेवटचा प्रयत्न पूर्ण करू शकला नाही. असे असूनही त्याला सुवर्णपदावर आपले नाव कोरण्यात त्याला यश आले. सामोआचा अनुभवी लिफ्टर वैपावा इओनेने एकत्रित २९३ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले, तर नायजेरियाच्या एडिडिओंग उमोफियाने २९० किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले.
मिझोराममधील आयझोल येथील रहिवासी असलेल्या १९ वर्षीय जेरेमीचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हे पहिलेच वर्ष आहे. त्याने २०१८ मधील युवा ऑलिंपिक स्पर्धेत ६२ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते.