राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांची दखल न घेतल्याने मराठा क्रांती मुक मोर्चाचे आता मराठा क्रांती ठोक मोर्चात रुपांतर झाले आहे. त्याचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटत आहेत. काल राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. या आंदोलनादरम्यान दोन आंदोलकांनी आत्महत्या केल्या आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल निवेदनाद्वारे मराठा समाजाशी चर्चेशी तयार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतरही आंदोलनाची धग काही कमी झाली नाही. पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील वारजे उड्डाणपुलाखाली आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाचे अनेक कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी “एक मराठा लाख मराठा” अशा घोषणा देत रस्त्यावरच ठिय्या मांडला. दरम्यान घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करत हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.















