न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑगस्ट २०२२) :- यंदाच्या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त संपूर्ण देशात हर घर तिरंगा हा राष्ट्रभक्ती उपक्रम राबविला जात आहे. दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान प्रत्येक देशवासीयांच्या घरावर तिरंगा फडकवण्याचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागाने शहरात प्रबोधन पर ठीक ठिकाणी “हर घर तिरंगा” जनसंवाद मोहीम राबविण्यात येत आहे.
या निमित्ताने आज रोजी निगडी वाहतूक विभाग व देहूरोड पोलीस ठाणे या ठिकाणी पोलीस मित्र- एस पी ओ जनसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख उपस्थिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील, निगडी वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक विजया कारंडे, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्य अध्यक्ष विजय पाटील, महिला प्रमुख अर्चना घाळी, विजय मुनोत,विभागीय अध्यक्ष विशाल शेवाळे, बाबासाहेब घाळी, जयेंद्र मकवाना,भरत उपाध्ये, बळीराम शेवते, विजय जगताप,विभावरी इंगळे, गौरी सरोदे संतोष चव्हाण,सतिश देशमुख उपस्थित होते.
या निमिताने पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील म्हणाल्या,” स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशात आनंदाचे वातावरण आहे.देशात प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत.आपल्या सर्वांचा सहभाग स्वातंत्र्याचा आनंद द्विगुणित करणार यात शंका नाही. निगडी वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षिका विजया कारंडे म्हणाल्या,” स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पोलीस मित्र, एस पी ओ तसेच प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे कार्यकर्ते यांच्या संयुक्त सहभागाने निगडी विभागात ७५ देशी-आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच सदभावना रॅली, तसेच ७५ कर्तव्यदक्ष चालक व कर्तव्यदक्ष पोलीस मित्र यांचा मेडल देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,”पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वीर क्रांतिकारकांचे स्मरण ,हर घर तिरंगा,तसेच प्रबोधनात्मक विविध सामाजिक उपक्रम दिनांक ११ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट च्या दरम्यान राबविण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी त्यामध्ये उस्फूर्तपणे सहभागी व्हावे.”












