न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑगस्ट २०२२) :- रहाटणीतील राज स्नॅक्स अँड स्वीट सेंटर येथे जाऊन आरोपींनी फिर्यादीच्या भावाकडून दहीहंडीची वर्गणी मागितली व हातातील वर्गणीचे पुस्तक दिले. विवेक यांनी त्यांना शंभर रुपये दिले मात्र त्यांनी विवेकच्या कानाखाली मारून ५०० रुपयांची मागणी केली. त्यावेळी विवेकने दोनशे रुपये देऊ केले. सुनील शेट्टी व विजय तलवारे यांना त्याचा राग आल्याने त्यांनी विवेक यास हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी फिर्यादी त्यांना समजावून सांगत असताना विजय तलवारे, सुनील शेट्टी, माऊली उपल्ले, यश रसाळ, रोहीत शिंदे उर्फ बॉण्ड, मनेश उर्फ मन्या कदम, प्रसाद राऊत व त्यांच्या सोबतचे ३ ते ४ लोक दुकानामध्ये घुसले सर्वांनी मिळून त्यांचा भाऊ विवेक व पवन यांना हाताने मारहाण केली. तसेच दुकानामधील स्नॅक्स काउंटर खाली पाडले व त्याच्या काचा फोडून सुनील शेट्टी व विजय तलवारे यांनी फिर्यादी व त्यांच्या भाऊ यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुनील शेट्टीने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यावेळी फिर्यादी व त्यांच्या भावाला वाचविण्यासाठी आलेल्या त्यांच्या आई-वडिलांनाही विजय तलवारे व सुनील शेट्टीने ढकलून देऊन वडिलांनाही हाताने मारहाण केली. त्यांनी फिर्यादी यांचे खाली पडलेल्या स्नॅक्स काउंटरच्या गल्ल्यामधून दिवसभरामध्ये झालेल्या धंद्याचे अंदाजे दहा ते बारा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पुढील महिन्यापासून दर महिन्याला हप्ता चालू करायचा नाही नाहीतर तुमच्या आई-वडिलांना मारून टाकू, अशी धमकी दिली. त्यांनी दुकानासमोर आरडाओरडा करून दहशत माजवून तिथून सर्वजण निघून गेले. मंगळवारी (दि. ९) रात्री आठच्या दरम्यान रहाटणीत ही घटना घडली.
राहुल गुप्ता, (वय २७, रा. जय भवानी चौक, रहाटणी लिंक रोड रहाटणी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चार जणांना अटक करण्यात आली आहे. प्रसाद राऊत (वय २५), मनीष उर्फ मन्या कदम (वय १८), माऊली उपल्ले (वय २१), यश रसाळ (वय २०) यांना अटक करण्यात आली आहे. रोहित शिंदे उर्फ बॉंड, सुनील शेट्टी, विजय तलवारे व त्यांच्यासोबत इतर तीन ते चार जण हे देखील आरोपी आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












