न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रु.) :- माणसाच्या सुखाच्या अतिरेकी इच्छा हे ताणतणावाचे मुख्य कारण आहे. त्याचे व्यवस्थापन करायचे असेल तर मनाला आवर घालणे आवश्यक आहे. ‘कुठे थांबायचं ’ हे ज्याला कळले तो माणूस सुखी असतो. त्यामुळे जीवनात कायम ज्ञान, भक्ती आणि कर्म याचा मेळ घालून जीवन जगता आले पाहिजे. श्रध्दा व प्रार्थना ज्ञानपुर्ण असावी. सुखासाठी सत्कर्म व निस्वार्थाची जोड दिल्यास जीवन परिपुर्ण ठरेल असे मार्गदर्शन डॉ. संजीवकुमार पाटील यांनी केले.
तानाजीनगर चिंचवड येथील गजानन महाराज मंदिरात श्री. गजानन महाराज यांच्या प्रगटदिनानिमित्त आयोजित केलेल्या महोत्सवात रविवारी (दि.१७) सायंकाळी डॉ. पाटील व डॉ. माया भालेराव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. शोभा जोशी, संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ धनवे, उपाध्यक्ष किशोर कदम, कार्यवाह प्रताप भगत, साजिद पठाण यांच्यासह सर्व पदाधिकारी, सभासद, भक्तगण उपस्थित होते.
यावेळी अखिल भारतीय भूलतज्ञ संघटनेच्या शहर खजिनदार डॉ. माया भालेराव यांनी ह्दय विकाराचा झटका आल्यानंतर रुग्णास देण्यात येणा-या प्रथम उपचाराचे प्रात्यक्षिक सादर केले. हे प्रथम उपचार म्हणजे अशा रुग्णाला जीवन संजीवनी ठरते. एखाद्या व्यक्तीचे ह्दय किंवा श्वास बंद झाल्यास त्याला प्रथम तोंडावाटे श्वास देऊन व छातीवर दाब देऊन उपचार करावेत. अशा उपचारांची माहिती घेऊन प्रत्येक नागरिक ‘जीवन रक्षक’ बनू शकतो. या प्रात्यक्षिकांचा समावेश शालेय अभ्याक्रमात करावा यासाठी अखिल भारतीय भूलतज्ञ संघटनेतर्फे शासन दरबारी प्रयत्न चालू आहेत, असे डॉ. भालेराव यांनी सांगितले. तत्पुर्वी सकाळी मंदिरामध्ये सातव पॅथोलॉजी लॅब यांच्या सौजन्याने नागरिकांची रक्त शर्करा, लिपीड प्रोफाईल व थायरॉईडची तपासणी करण्यात आली.
स्वागत विश्वनाथ धनवे, सुत्रसंचालन श्रीपाद जोशी आणि आभार दत्तात्रय सावकार यांनी मानले.











