- दिवसाआड पाणीकपात रद्द होईल?; नागरिकांना नवीन आयुक्तांकडून अपेक्षा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे मावळातील पवना धरण पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे शहरवासियांची पुढील वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीकपात सुरू आहे. त्यात आणखी पाणीकपात करावी लागेल, अशी परिस्थिती काही दिवसांपूर्वी होती. पवना धरणातील पाणीसाठा खूपच कमी झाला होता. त्याची दखल घेऊन पाटबंधारे विभागाने महापालिकेला पत्र पाठवून आणखी काटकसरीने करण्याची आणी मोठी पाणीकपात करण्याची स्पष्ट सूचना केली होती. त्यादृष्टीने आणखी पाणीकपात करण्याच्या दृष्टीने पालिकेने हालचाली सुरू केल्या. तथापि, ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतर धरण क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरू झाला. पवना धरण पूर्णपणे भरल्याने शहराची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
पवना धरण शंभर टक्के भरले आहे. त्यातच महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी नवे आयुक्त शेखर सिंह यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्याकडून नागरिकांना सुरळीत आणि नियमित पाणी पुरवठ्याबाबत मोठ्या अपेक्षा आहेत. ते पिंपरी चिंचवड शहरावर लादलेली दिवसाआड पाणीकपात रद्द करतील, अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे.


















