- एनआयपीएमचे कामगार कायद्यांची अंमलबजावणीवरील चर्चासत्र संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२२) :- नवीन कामगार कायद्यात कामगारांची सुरक्षितता, आरोग्य, आर्थिक सक्षमीकरण आदी बाबींवर विचार करण्यात आल्याने नवीन रोजगारामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. यामुळे या कामगार कायद्याच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची निर्मिती होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी केले.
केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट मॅनेजमेन्ट (एनआयपीएम) च्यावतीने ‘कामगार कायद्याची अंमलबजावणी’ या विषयाबाबत आयोजित चर्चासत्राच्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट चे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी व नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष राजेश पांडे, कामगार आयुक्त सुरेश जाधव, अपर कामगार आयुक्त अभय गीते आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री यादव म्हणाले, नवीन कामगार कायद्यात स्त्री-पुरुष यांना समान वागणूक देऊन समान वेतन देण्यात येणार आहे. मालक आणि कामगार यांच्यातील चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न या कायद्यांमध्ये केला आहे. नवीन डिजिटल कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करुन कामगारांचा दर्जा देण्यात येत आहे. उद्योग क्षेत्र मजबूत करण्यासाठी कामगारांच्या समस्या व सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे. कामगारांकडून कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन करुन उद्योग क्षेत्रात वाढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सार्वजनिक सेवा केंद्रांच्या माध्यमातून संघटित व असंघटित कामगारांची नोंदणी करण्यात येत आहे.
औद्योगिक क्षेत्रात महिला कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही चांगली बाब आहे. महिलांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांना कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण करुन देण्यासाठी औद्योगिक आस्थापनांनी देखील प्रयत्न करण्याची गरज आहे.कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी सोबत येऊन काम करुया असे, आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, देशात संघटित आणि असंघटित क्षेत्रात कार्य करणाऱ्या कामगारांना मनुष्य म्हणून बघितले पाहिजे. त्यांना माणुसकीच्या नात्याने मदत केली पाहिजे. कामगारांची संख्या बघता औद्योगिक क्षेत्रानी सामाजिक उत्तर दायित्व निधीमधून कामगार व त्यांचे कुटुंबियांचे आरोग्य, विवाह, शिक्षण आदी खर्चाबाबत तरतूद करण्यासाठी पुढाकार घ्यावा .संपूर्ण देशातून महाराष्ट्र राज्यात कामगार येत असतात. त्यांचे जीवनमान समृद्ध करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रानी प्रयत्न करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
परिसंवादाचे प्रास्ताविक करताना एन आय पी एम चे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी उद्योग क्षेत्राच्या वाटचालीत मनुष्यबळ व्यवस्थापकांचे योगदान लक्षात घेता केंद्र सरकारने त्यांचे नेतृत्व करणाऱ्या एन आय पी एम संस्थेला चार्टर्ड स्टेटसचा दर्जा द्यावा अशी मागणी केली तसेच एन आय पी एम च्या उपक्रमाबाबत माहिती दिली तर डॉक्टर एस व्ही भावे, अॅड अभय नेवगी, अॅड आदित्य जोशी यांनी कामगार कायद्यांच्या अंमलबजावणी बद्दल उद्योग क्षेत्राच्या अपेक्षांबद्दल मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन अमृता करमरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेंद्र पाटील यांनी केले.


















