न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२२) :- तालेरा रूग्णालय आंतररुग्ण विभागात महिलांचा प्रसुती विभाग आहे. इतर मेडिसीन आणि इतर काही विभागाचे केवळ बाह्य रुग्ण विभाग सुरू आहेत. या रुग्णालयात प्रसुती विभाग सुरु असूनही येथील सोनोग्राफी मशीन गेल्या दीड वर्षापासून बंद आहे. यामुळे गरोदर महिलांना सोनोग्राफी करण्यासाठी थेरगाव येथील महापालिकेच्या रुग्णालयात जावे लागते. वैद्यकीय विभागाचे तालेरा रुग्णालयाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
या रुग्णालयात मेडिसीन कान – नाक – घसा, नेत्र विभाग, स्त्रीरोग तज्ज्ञ होते. अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया तालेरा रुग्णालयात होत होत्या. तालेरा रुग्णालयाचा विस्तार करून नवीन इमारत उभारण्यात आली. यामुळे चिंचवडकरांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळेल अशी आशा होती. मात्र तालेरा स्णालयाची जुनी इमारत धोकादायक झाल्याचे सांगत ती पाडण्यात आली. यामुळे येथील अनेक विभाग बंद करण्यात आले. अद्यापही नवीन इमारतीचे ३० टक्के काम बाकी असून ते कामही संथगतीने सुरू असल्याने येथील वैद्यकीय सेवेवर मोठा परिणाम झाला आहे.
विस्तारिकरण केलेल्या इमारतीमध्ये आंतररुग्ण विभागात महिला वॉर्ड आणि प्रसुती विभाग सुरू करण्यात आला आहे. बाह्य रुग्ण विभागात पुरूष मेडिसीन, महिला मेडिसीन, रक्त तपासण्या आदी विभाग सुरू आहेत. तसेच करोना चाचणी आणि लसीकरणही याच इमारतीमध्ये केले जाते. महिला प्रसुती वॉर्ड असूनही याठिकाणी सोनोग्राफीची सुविधा नाही. करोना काळापासून येथील सोनोग्राफी मशिन बंद असून ती दुरूस्त करण्यात आलेली नाही.















