न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या सेवेमध्ये काम करत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला शासकीय सेवेमध्ये अनुकंपा तत्वावर घेतले जाते. दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याचा पात्र वारसदार सज्ञान नसेल तर तो सज्ञान झाल्यानंतर एक वर्षांच्या आत अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी अर्ज करावा लागतो. त्यांना दिवंगत कर्मचाऱ्याच्या जागेवर सामावून घेतले जाते. मात्र, २०१७ मध्ये शासनाने ३१ डिसेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांस अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी पात्र समजले जाणार नसल्याचा आदेश काढला.
त्यामुळे महापालिकेतील १२ कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासन निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. परिणामी नोकरीसाठी अर्ज करून पात्र असूनही या वारसांना महापालिकेत नोकरी मिळत नाही. त्यामुळे मयत झालेल्या कुटूंबाची मोठी परवड होत आहे. या कर्मचाऱ्यांचे वारस महापालिकेकडे येऊन नोकरीबाबत विचारणा करत आहेत. मात्र, शासनाच्या आदेशामुळे महापालिका प्रशासनाची इच्छा असतानाही त्यांना पालिका सेवेत घेता येत नाही.
महापालिका सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पात्र वारसांना सेवेत घेतले जाते. मात्र, राज्य शासनाने २०१७ मध्ये जारी केलेल्या आदेशामुळे संबंधित मयत झालेल्या कर्मचाऱ्याला २००१ नंतर तीन अपत्य असतील तर त्यांना सेवेत घेता येणार नसल्याचा आदेश आहे. त्यामुळे १२ कर्मचाऱ्यांच्या वारसांना पालिका सेवेत घेता येत नाही.
– बाळासाहेब खांडेकर, सहाय्यक आयुक्त, प्रशासन विभाग...


















