न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२२) :- पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या नियमित प्रवेश फेरीत १२ हजार २५३ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. ४ हजार ४७६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना आज बुधवारी २४ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
पुणे विभागात ३०८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १ लाख ९ हजार ७९० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यातील ८५ हजार २४० जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत. प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत दोन नियमित फेऱ्या राबविण्यात आल्या.
प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आणि महाविद्यालय प्रवेश सोमवारी जाहीर करण्यात आली. तिसऱ्या फेरीत ४ हजार ४७६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, २ हजार ३७० विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे, १ हजार ५२४ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. विद्यार्थ्यांना चौथ्या, ८१८ विद्यार्थ्यांना पाचव्या पसंती क्रमांकाचे महाविद्यालय मिळाले आहे.
कला शाखेत १ हजार २३४, वाणिज्य शाखेत ४ हजार ६७६, विज्ञान शाखेत ६ हजार ११०, एचएसव्हीसीत २३३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. तिसऱ्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी आणि प्रवेशाची प्रक्रिया आजच पूर्ण करावी लागणार आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत सहभागी करून घेतले जाणार नाही.