न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२२) :- देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी – चिंचवड शहरातही घरोघरी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत तिरंगा ध्वज नागरिकांनी आपल्या घरावर फडकाविला आहे. मात्र, हा उपक्रम संपून आठवडा उलटला. त्यानंतरही शहरातील अनेक नागरिकांच्या घरांवर तिरंगा अजूनही जैसे थे आहे. त्यामुळे नागरिकांनी घरांवर असलेला तिरंगा सन्मानपूर्वक उतरावावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनानुसार पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा केला. महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी तीन लाख राष्ट्रध्वज स्वतः खरेदी केले. तर एक लाख राष्ट्रध्वज राज्य सरकारने महापालिकेला दिले होते, असे चार लाख राष्ट्रध्वज शहरातील नागरिकांना आलेल्या किंमतीत महापालिकेने विकले होते. शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात राष्ट्रध्वज खरेदी करून घरांवर तिरंगा तीन दिवस फडकाविला. वास्तविकता: १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता राष्ट्रध्वज प्रत्येक नागरिकांनी घरांवरून उतरविणे अपेक्षित होते. मात्र, यामधील अनेक नागरिकांच्या घरांवर आजही राष्ट्रध्वज जैसे थे आहे.
या राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ शकतो. तसेच वाऱ्यांने तो खालीही पडू शकतो. याबाबत सोमवार (दि. २२) रोजी झालेल्या जनसंवाद सभेमध्ये काही नागरिकांनी अनेक घरांवर राष्ट्रध्वज अद्यापही असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत फडकवण्यात आलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक उतरवून योग्य ठिकाणी ठेवावेत असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


















