न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रु.) :- शहर शिवसेना व भाजप यांच्यात कलगीतुरा सुरु झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्यात आले होते. त्यांची सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व काही नगरसेवक यांनी भेट घेतली होती. त्यांना त्यावेळी युती झाली, तर मावळ मतदार संघ भाजपकडे घ्या. अन्यथा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यास व विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हेच युतीचे उमेदवार असल्यास शहर भाजप त्यांचे काम करणार नसल्याचा इशारा दिला होता.
आता शिवसेना भाजपची युती झाली आहे. त्यामुळे भाजपने मावळ मतदार संघ भाजपकडे घ्यावा, यासाठी सत्ताधारी भाजपचे जोरदार लॉंबिंग सुरु झाले आहे. काही कार्यक्रमानिम्मित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. खासदार बारणे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या थेरगाव परिसरातील विद्यमान नगरसेविका झामाबाई बारणे, अर्चना बारणे, माया बारणे, कैलास बारणे, अभिषेक बारणे व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासह काही नगरसेवकांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली त्यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात आमदार लक्ष्मण जगताप यांना मावळमधून लोकसभेची उमेदवारी द्यावी. मावळ लोकसभेचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना युतीची उमेदवारी दिली, तर त्यांचा नक्कीच पराभव होईल. या मतदारसंघात भाजपाची ताकद वाढली आहे. लक्ष्मण जगताप हेच युतीचे सक्षम उमेदवार ठरतील. जगताप यांना उमेदवारी दिली तर ते प्रचंड मतांनी निवडून येतील. त्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघ भाजपकडे घ्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक अभिषेक बारणे, कैलास बारणे, नगरसेविका झामाबाई बारणे, माया बारणे, अर्चना बारणे, स्थायी सभापती ममता गायकवाड, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, शितल शिंदे, आरती चोंधे, माधुरी कुलकर्णी व आदी उपस्थित होते.











