- फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचा ‘शिवछत्रपती बिझनेस अवार्ड’ मान्यवरांना प्रदान
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १९ फेब्रु.) :- चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभाग्रहात फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने नुकतेच ‘शिवछत्रपती बिझनेस अवार्ड’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी जलसंवर्धन राज्यमंत्री विजयबापू शिवतारे, बी. व्ही. जी. ग्रुप उपाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, डायरेक्टर ऑफ इंडिया शैलेश रजपुत, महापौर राहुल जाधव, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, अध्यक्ष अभय भोर, सेक्रेटरी राहुल भगत, उपाध्यक्ष कार्तिक गोवर्धन, चेतन साबळे व बहुसंख्येने उद्योजक व महिला उपस्थित होत्या
पिंपरी चिंचवड शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांना राज्यमंत्री शिवतारे यांच्या हस्ते ‘शिवछत्रपती बिझनेस अवार्ड’ या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात बी. व्ही. जी. ग्रुप उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय गायकवाड, उद्योजक रघुनाथ तापकीर, अजिंक्य चोरडिया, डी. टी. केशवानी, यशवंत गुंजाळ, रघुनाथ तापकीर, राजेंद्र लुंकड, संतोष सौदागर, मोहन बागमार, नितीन धिमधिमे, मकरंद पांडे, सिद्धार्थ गायकवाड, महेंद्र संकलेचा, सोनू हरी, शिल्पा शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे आदी उद्योजकांना यावेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राज्यमंत्री विजय बापू शिवतारे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील व जिल्ह्यातील उद्योजकांच्या ज्या समस्या असतील, त्यावर पालकमंत्री व उद्योगमंत्री यांची बैठक घेऊन त्या सोडविण्यात येतील. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात उद्योजकांनी आपले उद्योग उभारावेत. येथेसुद्धा त्यांना सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात येतील. बँकांतर्फे काही अडचणी असल्यास, त्या दूर केल्या जातील, असे आश्वासन उपस्थित उद्योजकांना शिवतारे यांनी यावेळी दिले.
फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या उपस्थित मान्यवरांसमोर व्यक्त केल्या. तसेच फोरमच्या माध्यमातून उद्योजक व नव-उद्योजक यांच्यासाठीच्या सुरु असलेल्या नाविन्यपूर्ण योजनांची माहिती सांगितली. यात ग्रुप इंडस्ट्रीज कन्सेप्टनुसार नवीन उद्योगांना संधी, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे वेगवेगळे विभाग, त्या विभागांमार्फत नवतरुण उद्योजकांना व तरुणांना रोजगाराच्या संधी, उद्योग, व्यवसाय इत्यादीबाबत मार्गदर्शन, जागा तसेच समूह कर्ज योजना आदींबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हा उद्योग केंद्राचे प्रमुख रजपूत यांनीही यावेळी उपस्थितांना उद्योगांविषयी मार्गदर्शन केले.
सह्याद्री वाहिनीच्या मृण्मयी यांनी निवेदन, तर चित्रा मातेरे यांनी आभार प्रदर्शन केले.











