- तत्कालीन आयुक्त राजेश पाटील ठरले सीईओ ऑफ द ईअर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२२) :- गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, स्मार्ट सिटीज कौन्सिल इंडियाच्या वतीने आयोजित ७ व्या स्मार्ट शहरीकरण २०२२ प्रदर्शनात पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीला ” स्मार्ट एनर्जी, सिटीजन इंगेजमेंट आणि मोस्ट पॉप्युलर सीईओ ” या तीन पुरस्काराने शुक्रवारी मुंबईत सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमास स्मार्ट सिटी कौन्सिल इंडियाचे संस्थापक व कार्यकारी संचालक प्रताप पडोडे, प्रधान सचिव सोनिया सेठीकोरी ग्रे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले. हा पुरस्कार आयुक्त शेखर सिंग यांनी स्वीकारला. यावेळी सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, कंपनी सेक्रेटरी चित्रा पवार यांची उपस्थिती होती.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, प्रदर्शनामध्ये ५० हून अधिक वक्ते, ५०० हून अधिक अधिकारी, राष्ट्रीय जागतिक कंपन्या, वित्त पुरवठादार, व्यावसायिक, तंत्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, आर्किटेक्ट, विकासक, नगर नियोजक आणि नागरिक, संस्थांनी सहभाग घेतला होता. मिळालेल्या यशामुळे यापुढे चांगले काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे.
स्मार्ट सिटी कॉन्सिल इंडियाला ७ वर्षे पूर्ण झाल्याने वॉशिग्टन डीसी आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सहकार्याने ७ व्या स्मार्ट शहरीकरण २०२२ भारताच्या स्मार्ट शहरांच्या प्रवासासाठी आव्हाने आणि उपाय शोधणे व व्यापार वाढीसाठी सरकारी, खाजगी क्षेत्र आणि व्यावसायिक यांची एकत्रित चर्चा होण्याकरिता हे प्रदर्शन झाले. त्यात लोकप्रिय लीडरशिप अवॉर्ड या श्रेणीत तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांना स्मार्ट आणि सक्सेसफुल एसपीव्ही सीईओ ऑफ द ईअर पुरस्कार मिळाला.
दरम्यान भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांनी स्मार्ट सिटीचे अभिनंदन करीत, ” आम्ही पिंपरी चिंचवडकर स्मार्ट सिटी घडवणार; यशाची नवनवी शिखरं गाठणार” अशी पोस्ट व्हायरल केली आहे.
















