न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२२) :- रिक्षाच्या पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यासाठी २१ रुपयांवरून २५ रुपये, तर त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १४ रुपयांवरून १७ रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे. एक सप्टेंबरपासून ही भाडेवाढ लागू होणार असल्याचे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत शनिवारी घेण्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि प्राधिकरणाचे सचिव डॉ.अजित शिंदे यांनी सांगितले.
रिक्षा संघटनांनी केलेल्या मागणीनुसार २५ जुलैला रिक्षा भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यासाठी २३ रुपये, तर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरला पंधरा रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. मात्र, या दरवाढीबाबत रिक्षा संघटनांनी आक्षेप नोंदवले होते.
प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी याबाबत सांगितले, की सर्व रिक्षा संघटना आणि ग्राहक संघटनांशी चर्चा करून आणि खाटुआ समितीच्या शिफारशीनुसार रिक्षाच्या भाडेवाढीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ही दरवाढ एक सप्टेंबरपासून लागू होणार आहे. दरवाढीनुसार रिक्षा मीटरचे प्रमाणीकरण करण्यासाठी रिक्षा चालकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १ सप्टेंबरला रिक्षाच्या मीटरचे प्रमाणीकरण झालेल्या रिक्षा चालकांनाच दरवाढीनुसार भाडे आकारणी करता येईल.
















