- बंदोबस्तासाठी पोलिसांसह होमगार्ड आणि एसआरपीएफची फौज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२२) : – तब्बल दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे उत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तब्बल २० अधिकारी १०० पोलीस कर्मचारी यांच्यासह ३०० होमगार्ड यांचा बंदोबस्त शहरात असणार असून एसआरपीएफची १ कंपनीदेखील तैनात असणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, आता कोरोनाचे संकट टळले असून यंदाचा उत्सव हा निर्बंधमुक्त करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.
शहरात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली आहे. उत्सवकाळात पोलीस दल सतर्क राहणार असून साध्या वेषातदेखील पोलीस गस्त घालणार आहेत. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मोठ्या मंडळांना सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या मंडळांवर सीसीटीव्हीमार्फत नजर ठेवण्यात येणार आहे. सीसीटीव्हीमुळे गर्दीतील चोरी, छेडछाडीचे प्रकार रोखण्यास मदत होणार आहे.















