- घरातील व सार्वजनिक गणेशमूर्तीची यावेळेत करा स्थापना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२२) :- विघ्नहर्ता गणरायाचे स्वागत करण्यासाठी मंडळांसह भाविक सज्ज झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी अर्थात बुधवारी (दि. ३१) ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४ वाजून ४८ मिनिटे ते दुपारी १ वाजून ५४ मिनिटांपर्यंत घरोघरी आपल्या सोयीनुसार गणरायाची प्रतिष्ठापना करता येणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना मध्यान्हानंतर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करता येऊ शकेल. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तापासून ते दुपारी १ वाजून ५४ मिनिटांपर्यंत प्रत्येकाला आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना त्याकरिता भद्रादि (विष्टि) आणि पूजन करता येईल किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची आवश्यकता नाही, असे पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
गृहिणींना गौरी आगमनाचे वेध…
शनिवारी (दि. ३ सप्टेंबर) अनुराधा नक्षत्र दिवसभर असल्याने दिवसभरात आपल्या सवडीनुसार केव्हाही गौरी आवाहन करता येईल. ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावे, असे असल्याने रविवारी (दि. ४ सप्टेंबर) नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे. सोमवारी (५ सप्टेंबर) मूळ नक्षत्रावर रात्री ८ वाजून ६ मिनिटांपर्यंत केव्हाही गौरी आणि गणपतीचे विसर्जन करता येईल. यावर्षी अनंत चतुर्दशी शुक्रवारी (दि. ९ सप्टेंबर) आहे. या दिवशी दिवसभरात दहा दिवसांच्या गणपतींचे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशाचे विसर्जन केव्हाही करता येईल.















