- ‘ गणपती बाप्पा मोरया ‘ च्या गजरात लाडक्या गणरायाचे स्वागत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२२) :- आजपासून पुढील दहा दिवस शहर गणेशमय होणार आहे. गणरायाच्या आगमनासाठी गेल्या काही दिवसांपासून उद्योगनगरीत जोरदार तयारी सुरू आहे. आज ती प्रतीक्षा संपली. गणेशभक्तांनी ‘ गणपती बाप्पा मोरया ‘ ‘ आले रे आले बाप्पा आले ‘ चा गजर करीत घरोघरी ‘ श्रीं ‘ च्या मूर्तीचे स्वागत केले. डोक्याला ‘ गणपती बाप्पा मोरया फीत बांधून, रेशमी वस्त्र घेऊन गणेश मूर्ती नेण्याची लगबग सर्वत्र सुरू आहे. यावेळी लहानग्यांचा उत्साह शिगेला पोहचलेला दिसतोय. काही ठिकाणी ताशांच्या तसेच टाळ मृदंगाच्या नादात लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यात आले.
लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी आबालवृद्ध आणि मंडळातील कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून तयारीत गुंतले होते. आजपासून या आनंद सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आता पुढील दहा दिवस शहराच्या कानाकोपऱ्यात ‘ मोरया मोरया ‘ चा गजर सुरू असेल. हलते देखावे, सजावट, जिवंत देखाव्यांची लगबग, मंडप, स्वागत कमान, पताका आणि रंगकामाला वेग आलाय.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बहुतेक सर्वच ठिकाणच्या मंडपात रंगीबेरंगी कापड आणि लाईटींग माळा लावण्याचे काम सुरू आहे. कमानीसाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी खाबांना कापड, झालर बांधण्याचे काम अनेक ठिकाणी पूर्ण झाले आहे. तर काही ठिकाणी उत्सव मांडवापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झील बांधण्याचे आणि विद्युत रोषणाई करण्याचे काम सुरू आहे. गणपतीच्या मूर्ती खरेदी करण्याबरोबरच सजावटीसाठी, झिरमिळ्या, फुलाच्या माळा, लाईटिंगच्या माळा अशा सजावटींचे साहित्य खरेदी करण्यासाठी पिंपरी, भोसरी, निगडीतील बाजारपेठ फुलून गेली आहे. गणपतीबरोबरच महिलांनी गौरीच्या आगमनाची तयारीदेखील सुरू केली आहे.















